
नाशिक, 18 जुलै (हिं.स.) : सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील प्रस्तावित परिक्रमा मार्ग (रिंग रोड) प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) यांच्या माध्यमातून खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेत 100 वे खरेदीखत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे.मौजे बेळगाव ढगा येथील प्रकाश नामदेव पवार यांच्या जमिनीचे खरेदीखत पूर्ण झाल्यानंतर या प्रक्रियेने शतक पूर्ण केल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. परिक्रमा मार्ग प्रकल्पासाठी आतापर्यंत सुमारे 410 कोटी रुपये किमतीच्या जमिनीची थेट खरेदी पूर्ण करण्यात आली आहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शेतकरी आणि जमीनधारकांकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे भूसंपादन प्रक्रियेला अपेक्षित वेग मिळत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
100 वे खरेदीखत पूर्ण झाल्याच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार कोळी, उपअभियंता श्री. बिरारीस तसेच विधी अधिकारी श्री. गुंजाळ उपस्थित होते.
परिक्रमा मार्ग प्रकल्पासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व शेतकरी, जमीनधारक आणि महसूल प्रशासनाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अभिनंदन करत आभार व्यक्त केले.------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV