बीड - मामानेच सख्ख्या भाच्याला लावला १९ लाखांचा चुना
बीड, 18 जुलै (हिं.स.)।मह सूल विभागात लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका मामाने आपल्या सख्ख्या भाच्याला तब्बल १९ लाख रुपयांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार केज तालुक्यात उघडकीस आला आहे. परभणी येथील न्यायालयात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या माम
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक


बीड, 18 जुलै (हिं.स.)।मह सूल विभागात लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका मामाने आपल्या सख्ख्या भाच्याला तब्बल १९ लाख रुपयांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार केज तालुक्यात उघडकीस आला आहे. परभणी येथील न्यायालयात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या मामानेच हा फसवणुकीचा डाव रचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या भाच्याने दिलेल्या तक्रारीवरून मामाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील फिर्यादी अमोल मधुकर चिगुरे (वय २८, रा. तांबवा, ता. केज, जि. बीड) असे असून त्याचे सख्खे मामा दगडू विठ्ठलराव हंगरगे (वय ४८, रा. माऊली नगर, जलालपूर रोड, परळी वैजनाथ, ह. मु. पालम, जि. परभणी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मामाचे नाव आहे. आरोपी दगडू हंगरगे हा परभणीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात लिपिक पदावर कार्यरत आहे. त्याने फिर्यादी अमोल याला विश्वासात घेऊन महसूल विभागात लिपिक तथा महसूल सहाय्यक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. नोकरीसाठी मामाकडून १९ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.

मामावर विश्वास ठेवून अमोल चिगुरे याने ७ जून २०२२ व ५ जुलै २०२२ रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या केज शाखेतून ऑनलाईन आरटीजीएस द्वारे आणि त्यानंतर ८ जानेवारी २०२३ रोजी रोख स्वरूपात असे मिळून एकूण १९ लाख रुपये मामाला दिले. मात्र, तीन वर्षे उलटूनही नोकरी लागली नाही. वारंवार विचारणा करूनही मामाने खोटे आश्वासन देत फसवणूक केली आणि पैसे परत करण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अमोल चिगुरे याने केज पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीवरून आरोपी मामा दगडू हंगरगे याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५३/२०२६ नुसार भारतीय दंड विधान कलम ४२०, ४०६, ४६८ आणि ४७१ अन्वये फसवणूक व विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande