वर्ध्यात बोगस बियाण्यांसदर्भात ३३३ शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल
वर्धा, 18 जुलै (हिं.स.) | जिल्ह्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याची घोषणी शासनाकडून करण्यात आली. बोगस बियाण्यांसदर्भात आतापर्यंत जिल्ह्यात ३३३ हून अधिक शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या. त्यांच्यावर दुबार पे
घोषणा झाली, शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांची प्रतीक्षा बोगस बियाण्यांच्या ३३३ तक्रारी


वर्धा, 18 जुलै (हिं.स.) | जिल्ह्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याची घोषणी शासनाकडून करण्यात आली. बोगस बियाण्यांसदर्भात आतापर्यंत जिल्ह्यात ३३३ हून अधिक शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या. त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली असून त्यांना पेरणीकरिता दुबार खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने वेळीच शेतकऱ्यांना मोफत बियाणे पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे.

शासनाने घोषणा केली पण तसे लेखी आदेश अद्याप मिळाले नसल्याने कृषी विभाग हतबल आहे. मोफत बियाणे संदर्भात शासनाकडून घोषणी झाली असली तरी ते पुरविणार कसे याबाबत निश्चितता नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. यंदा वेळेवर झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र, अनेक ठिकाणी बियाण्यांची उगवण झाली नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. पहिल्या पेरणीसाठी केलेला खर्च वाया गेला असून आता नव्याने बियाणे, मशागत व मजुरीचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. देवळी पंचायत समिती अंतर्गत निकृष्ट बियाण्यांचे प्रकरण सर्वाधिक गंभीर ठरले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. कृषी विभागाने १७ ठिकाणांहून घेतलेल्या बियाण्यांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित उत्पादक व विक्रेत्यांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवसांत जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे दुबार पेरणीसाठी योग्य वेळ साधण्यासाठी प्रभावित शेतकऱ्यांना तातडीने मोफत बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. बियाण्यांचा पुरवठा उशिरा झाल्यास उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होण्याची भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

लेखी आदेशच नाही

शेतकऱ्यांच्या भावना जपण्याच्या नावावर शासनाने दुबार पेरणीची वेळ आलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीकरिता बियाणे देण्याची घोषणा केली. पण, तसे कुठलेही आदेश कृषी विभागाकडे आले नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. सध्या कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारींची छाननी सुरू आहे. केवळ आश्वासनांऐवजी तातडीने बियाणे उपलब्ध करून देणे हीच सध्याची खरी गरज असल्याचे शेतकरी बोलत आहेत.

४८९ हेक्टरवर दुबार पेरणी

जिल्ह्यात झालेल्या पेरणीत सोयाबीन नेहमी प्रमाणे कपाशीच्या पाठोपाठ आहे. अशात बोगस बियाण्यांचा फटका बसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. जिल्ह्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार ४८९ हेक्टरवर दुबार पेरणीची शक्यता आहे.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande