कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कृषी प्रणालीचा अंबाजोगाईत शुभारंभ
शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार बीड, 18 जुलै (हिं.स.) : कृषी क्षेत्रातील उत्पादनवाढ, अचूक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञा
कृषी प्रणालीचा शुभारंभ


शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार

बीड, 18 जुलै (हिं.स.) : कृषी क्षेत्रातील उत्पादनवाढ, अचूक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (BATU), लोणेरे यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आधारित कृषी प्रणालीचा शुभारंभ कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई येथे करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीनदयाल शोध संस्थान, बीडचे प्रकल्प प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरेचे शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. संजय नलबलवार, प्राध्यापक डॉ. ब्रिजेश अय्यर, गुरु गोविंदसिंह अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेडचे प्रा. रामचंद्र मंठाळकर, ॲग्रीपायलट एआय कंपनीचे निखिल मानेकर तसेच कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख उपस्थित होते.

यावेळी प्रा. डॉ. ब्रिजेश अय्यर यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सहकार्याने कृषी विज्ञान केंद्रात प्रमुख पिकांवर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. विद्यापीठातील विद्यार्थी आणि संशोधक प्रत्यक्ष शेतांमध्ये संशोधन करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान विकसित करतील. यामुळे उत्पादन खर्च कमी होण्यासोबतच संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि शेतकऱ्यांना अचूक निर्णय घेण्यास मदत होणार आहे.

प्रा. संजय नलबलवार यांनी सांगितले की, कृषी विज्ञान केंद्रात उभारण्यात आलेली कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणाली शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. मृदा आणि विविध सेन्सर्सच्या माध्यमातून जमिनीतील ओलावा, तापमान, हवेतील आर्द्रता, विद्युत वाहकता, क्षारता आणि सामू यांचे सातत्याने मोजमाप केले जाणार आहे. या माहितीच्या आधारे सिंचन व्यवस्थापन, खतांचे नियोजन आणि पिकांच्या वाढीचे अचूक व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.

ॲग्रीपायलट एआयचे निखिल मानेकर यांनी स्वयंचलित हवामान केंद्र, मोबाईल ॲप आणि डिजिटल कृषी तंत्रज्ञानाची माहिती दिली. हवामानावर आधारित सल्ला, खत व्यवस्थापन आणि पीक नियोजनासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, कृषी विज्ञान केंद्राच्या हिवरा प्रक्षेत्रावर स्वयंचलित हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून सुमारे पाच चौरस किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांना पर्जन्यमान, तापमान, वाऱ्याचा वेग, दिशा आणि इतर हवामानविषयक माहिती उपलब्ध होणार आहे.

या माहितीच्या आधारे सोयाबीन, तूर आणि आंबा या प्रमुख पिकांवर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित संशोधन करण्यात येणार असून, त्याचा थेट लाभ परिसरातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

कार्यक्रमास परिसरातील प्रगतिशील शेतकरी, कृषी अधिकारी आणि संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र कोरके यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रदीप सांगळे यांनी मानले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande