
छत्रपती संभाजीनगर, 18 जुलै (हिं.स.)। भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त जयप्रकाश माध्यमिक विद्यालय,रुईभर येथे विद्यार्थ्यांसाठी 'भूजल जागृती कार्यक्रम' उत्साहात आयोजित करण्यात आला.भूजल संवर्धन, पावसाच्या पाण्याचे संधारण, पाणी बचत आणि भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमात वरिष्ठ भूवैज्ञानिक रविंद्र मांजरमकर यांनी विद्यार्थ्यांना भूजलाचे महत्त्व,पावसाच्या पाण्याचे संधारण,भूजल पुनर्भरण, पाणी बचतीच्या सवयी तसेच भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वीकारावयाची जबाबदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. जलसंपत्तीचे संवर्धन ही काळाची गरज असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी आजपासूनच पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात,असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा पाणी गुणवत्ता प्रयोगशाळा,धाराशिव येथील रसायनी विजयकुमार गेंदले यांनी पाण्याची गुणवत्ता,दूषित पाण्यामुळे होणारे विविध आजार आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला.विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करत सुरक्षित व स्वच्छ पाण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमात वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) चे सतीश सुर्यवंशी यांनी 'अल निनो' आणि 'ला निनो' या नैसर्गिक हवामान प्रक्रियांची माहिती देत त्यांचा भारतीय मान्सूनवर होणारा परिणाम विद्यार्थ्यांना सविस्तरपणे समजावून सांगितला.हवामानातील बदलांचा जलस्रोतांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन जलसंवर्धनाचे महत्त्व त्यांनी विशद केले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनाची प्रतिज्ञा घेत जलसंपत्तीचे संरक्षण करण्याचा संकल्प केला.जयप्रकाश माध्यमिक विद्यालय,रुईभर येथील पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कनिष्ठ भूवैज्ञानिक मनिषा डोंगरे,सहायक भूवैज्ञानिक चंद्रकांत सुरवसे,वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे सतीश सुर्यवंशी,विद्यालयाचे पर्यवेक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis