
कोल्हापूर, 18 जुलै (हिं.स.) : लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गोकुळ दूध संघाच्या कर्मचारी संघटनेने केलेल्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले आहे. या आंदोलनाला गोकुळ प्रशासनाने कोणाच्या परवानगीने मंजुरी दिली, असा सवाल उपस्थित करत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गोकुळ कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. गोकुळ संघाशी थेट संबंध नसलेल्या विषयावर संघाच्या आवारात आंदोलन कसे करण्यात आले, यासाठी कोणाचा राजकीय दबाव होता का, तसेच या आंदोलनाचा गोकुळच्या दैनंदिन कामकाजावर काय परिणाम झाला, असे प्रश्न भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केले.
या वेळी भाजप कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेत असताना गोकुळचे प्रशासक प्रदीप मालगावे आणि कार्यकारी संचालक योगेश गोडबोले हे कार्यालयात उपस्थित नव्हते. जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने भाजप कार्यकर्त्यांनी प्रशासकांच्या खुर्चीला निवेदन चिकटवून आपला निषेध नोंदविला.
या आंदोलनामुळे गोकुळ दूध संघातील कर्मचारी आंदोलन आणि प्रशासनाची भूमिका यावरून पुढील काळात राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar