एसआयआर मोहिमेत काही बीएलओंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; मतदारांमध्ये गोंधळ
अमरावती, 18 जुलै (हिं.स.) : निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत प्रत्येक बीएलओने घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करून आवश्यक अर्ज भरून घेण्याचे निर्देश असताना, काही बीएलओ मतदारांनाच घरी बोलावून काम करत असल्याची तक्रार
बीएलओंच्या ‘वर्क फॉर्म होम’ने उडाला गोंधळ


अमरावती, 18 जुलै (हिं.स.) : निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत प्रत्येक बीएलओने घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करून आवश्यक अर्ज भरून घेण्याचे निर्देश असताना, काही बीएलओ मतदारांनाच घरी बोलावून काम करत असल्याची तक्रार पुढे आली आहे. या कार्यपद्धतीमुळे एसआयआर नोंदणी प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाल्याची भावना काही मतदारांनी व्यक्त केली आहे.

मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून एसआयआर मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत मतदारांची सखोल पडताळणी, मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करणे, बनावट नावे वगळणे, मतदारांच्या नागरिकत्वाची पडताळणी करणे तसेच स्थलांतर आणि वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अद्ययावत माहिती संकलित करणे अशी विविध कामे करण्यात येत आहेत.

या प्रक्रियेदरम्यान प्रत्येक बीएलओने मतदारांच्या घरी किमान तीन वेळा भेट देण्याचे निर्देश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र संबंधित भागातील काही बीएलओ मतदारांना दूरध्वनी करून स्वतःच्या घरी अथवा निश्चित ठिकाणी बोलावून अर्ज भरून घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे अनेक मतदार बीएलओ घरी येण्याची प्रतीक्षा करत असून, आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास मतदार यादीतून नाव वगळले जाईल की काय, अशी भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे एसआयआर मोहिमेच्या अंमलबजावणीत एकसमान कार्यपद्धती अवलंबून मतदारांमधील संभ्रम दूर करण्याची मागणी होत आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande