
परभणी, 18 जुलै (हिं.स.)। लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील उपोषण मैदानावर आठवण धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष राधाजी शेळके यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
पाठविलेल्या या निवेदनात, अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन संघर्ष दिन म्हणून घोषित करावा, मातंग समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, अण्णाभाऊ साठे व लहुजी साळवे जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी, अण्णाभाऊ साठे व क्रांतिवीर लहुजी साळवे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारसी तातडीने लागू कराव्या, परभणी शहरात क्रांतिवीर लहुजी साळवे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, शहरातील अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरातील अतिक्रमण हटवून परिसर सुशोभित करावा, छत्रपती संभाजीनगर विमानतळास क्रांतिवीर लहुजी साळवे यांचे नांव द्यावे, गायरान जमीनधारकांना मालकी हक्क द्यावा, राज्यातील झोपडपट्टी धारकांना पक्के घर द्यावे, दलितांना स्मशानभूमी द्यावी, मातंग समाजास गाव तिथे समाजमंदिर द्यावे, अण्णाभाऊ साठे व क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या कार्याचा अभ्यासक्रमात समावेश करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे अध्यक्ष राधाजी शेळके, प्रदेश सरचिटणीस बन्सीलाल भंडारी, शिवाजी शेळके, महिला आघाडी प्रमुख जिजाबाई शेळके, प्रदेश सचिव बाबासाहेब पाटोळे, मराठवाडा अध्यक्ष प्रा अंकुश कांबळे, काशीबाई शिरगुळे, विनायकराव रणेर, एमडी वाहुळे, सर्जेराव पाटोळे, काशिनाथ गायकवाड, गणेश घोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis