लातूरमध्ये ७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
लातूर, १८ जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ७ लाख १५ हजार ५६० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहतुकीसाठी व
पोलीस कारवाई


लातूर, १८ जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ७ लाख १५ हजार ५६० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार जप्त केली आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथक अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत असताना एका बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, टोयोटा कंपनीची पांढऱ्या रंगाची ईटीऑस कार (क्रमांक एमएच-१२-केएन-९७२९) मधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करून तो गंज गोलाई परिसरात विक्रीसाठी आणला जाणार आहे.

मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, १६ जुलै रोजी सायंकाळी ५.२० वाजण्याच्या सुमारास संशयित कार थांबवून तिची झडती घेण्यात आली. यावेळी कारमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मोठ्या प्रमाणातील गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

या कारवाईत अजीज महेबूब पठाण (वय ४० वर्षे, रा. अंधोरा, ता. औसा, जि. लातूर) याला ताब्यात घेण्यात आले. झडतीमध्ये विमल पान मसाला, व्ही-१ सुगंधित तंबाखू, रजनीगंधा पान मसाला यासह प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण २ लाख ६५ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टोयोटा ईटीऑस कार, किंमत ४ लाख ५० हजार रुपये, जप्त करण्यात आली.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५ आणि २२३ अन्वये गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे तसेच पोलीस अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, साहेबराव हाके, रसूल पठाण, रियाज सौदागर, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, मनोज खोसे, काकासाहेब बोचरे, राहुल कांबळे आणि संतोष खांडेकर यांनी केली.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande