
नाशिक, 18 जुलै (हिं.स.) : केंद्र सरकारच्या दर स्थिरीकरण योजनेंतर्गत नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांच्याकडून करण्यात येत असलेल्या कांदा खरेदीबाबत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अपेक्षित प्रमाणात कांदा उपलब्ध होत नसल्याने व्यापाऱ्यांच्या माध्यमातून कमी दरातील आणि हलक्या प्रतीचा कांदा शेतकऱ्यांच्या नावावर दाखवून बनावट खरेदी केली जात असल्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे.
दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारे गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर नाफेड आणि एनसीसीएफच्या नावाखाली होणाऱ्या कोणत्याही बनावट कांदा खरेदी व्यवहारांना साथ देऊ नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने शेतकऱ्यांना केले आहे.
संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी शेतकऱ्यांना सावध करताना सांगितले की, नाफेड किंवा एनसीसीएफच्या नावाखाली होणाऱ्या खरेदीसाठी कोणालाही सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक खाते पुस्तक किंवा इतर वैयक्तिक कागदपत्रे देऊ नयेत. अशा व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.
भविष्यात या व्यवहारांची चौकशी झाल्यास संबंधित व्यक्तींसह शेतकऱ्यांनाही चौकशीला सामोरे जावे लागू शकते. पुरावे आढळल्यास कायदेशीर कारवाईची शक्यता असून, शासकीय पडताळणी, अनुदान, कर्ज, विमा तसेच इतर सरकारी योजनांचा लाभ घेताना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे थोड्याशा आर्थिक फायद्यासाठी भविष्यातील अडचणी ओढवून घेऊ नका, असे आवाहन दिघोळे यांनी केले.
दरम्यान, या खरेदीतील गैरप्रकार टाळण्यासाठी सरकारने सुरुवातीपासूनच क्विंटलमागे तीन हजार रुपये दर देऊन दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली होती. यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला असता आणि सरकारलाही दर्जेदार कांदा उपलब्ध झाला असता, असे लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले.
दोन महिन्यांपूर्वीच वाढीव दराने खरेदी सुरू केली असती तर साखळीतील गैरप्रकारांना आळा बसला असता, असेही त्यांनी नमूद केले. या संदर्भात नाफेडच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.
अखेरच्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कांदा खरेदी होण्याची शक्यता वाढल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV