
मुंबई, 18 जुलै, (हिं.स.)। भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्या नावाने सोशल मीडियावर खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि बदनामीकारक पोस्ट प्रसारित करण्याच्या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र सायबर पोलिसांनी 14 सोशल मीडिया अकाऊंटविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित अकाउंटधारकांची ओळख पटविणे, डिजिटल पुरावे गोळा करणे आणि पोस्टचा उगम शोधण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.
भाजपाचे प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक निखिल भामरे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचे नाव, छायाचित्र आणि भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते अशी बनावट ओळख वापरून फेसबुक, इंस्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यात आल्या होत्या. या बनावट पोस्टद्वारे श्री. बन यांची प्रतिमा मलिन करण्याचा, समाजात त्यांच्याविषयी गैरसमज निर्माण करण्याचा आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. 14 वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सचा स्पष्ट उल्लेख करत या अकाउंटवर संबंधित पोस्ट प्रसारित झाल्याचे 'एफआयआर'मध्ये नमूद करण्यात आले आहे.
त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 319(2), 356(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिस या प्रकरणाचा तपास करीत असून चौकशीत आणखी तथ्ये समोर आल्यास संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे भामरे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर