
चंद्रपूर, 18 जुलै (हिं.स.) : संरक्षित क्षेत्रालगत राहणारे निरोगी आणि सक्षम समुदाय हे जैवविविधता संवर्धनातील महत्त्वाचे भागीदार ठरतात. याच उद्देशाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमध्ये राबविण्यात येणारा ‘मोबाईल हेल्थ युनिट’ उपक्रम समुदाय कल्याण आणि वन्यजीव संवर्धन यांचा प्रभावी संगम घडविणारा ठरत आहे.
२०२३ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाचा आतापर्यंत दुर्गम आणि वनालगतच्या गावांमधील ३० हजारांहून अधिक ग्रामस्थांनी लाभ घेतला आहे. दर्जेदार आरोग्यसेवा गावाच्या दारापर्यंत पोहोचल्यामुळे स्थानिक समुदायांचा वन विभागावरील विश्वास वाढण्यास मदत होत असून, मानव आणि वन्यजीव यांच्यातील सुसंवादी सहअस्तित्वालाही चालना मिळत आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्र १ हजार १०० चौ.कि.मी. पेक्षा अधिक विस्तारलेले असून, या परिसरात सुमारे १०० गावे आहेत. यापैकी अनेक गावांमध्ये आरोग्यसेवा सहज उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा खासगी दवाखान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
मोबाईल हेल्थ युनिट सुरू होण्यापूर्वी विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर उपचार मिळणे कठीण होत असे. त्यामुळे ग्रामस्थांना आर्थिक भार, शारीरिक त्रास आणि मानसिक तणाव सहन करावा लागत होता.
सध्या या उपक्रमाच्या माध्यमातून २९ गावांमध्ये ग्रामस्थांच्या दारापर्यंत प्राथमिक आरोग्यसेवा पोहोचविण्यात येत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, उर्वी अशोक पिरामल फाउंडेशन आणि कन्झर्व्हेशन वाइल्डलँड्स ट्रस्ट यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मोबाईल हेल्थ युनिट निश्चित वेळापत्रकानुसार प्रत्येक गावाला महिन्यातून दोन वेळा भेट देते. रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या वगळता दररोज दोन ते तीन गावांमध्ये आरोग्यसेवा पुरविण्यात येते.
या उपक्रमांतर्गत सर्वसाधारण वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणी, जंतनाशक औषधांचे वितरण, लोह व फॉलिक अॅसिड गोळ्यांचे वाटप, माता व बाल आरोग्य सेवा, प्राथमिक पॅथॉलॉजी तपासण्या तसेच आवश्यक औषधांचे मोफत वितरण केले जाते.
याशिवाय व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून पुनर्वसित झालेल्या कुटुंबांसाठी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. पुनर्वसन प्रक्रियेदरम्यान त्यांना सातत्याने आरोग्यसेवा मिळावी, याची विशेष काळजी घेतली जाते.
हा उपक्रम केवळ उपचारांपुरता मर्यादित नसून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेलाही महत्त्व देण्यात आले आहे. गावागावांत आरोग्य, स्वच्छता, पोषण आणि रोगप्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. कन्झर्व्हेशन वाइल्डलँड्स ट्रस्टतर्फे दरमहा ग्रामसभांच्या माध्यमातून आरोग्यदायी सवयी आणि आरोग्यविषयक माहिती दिली जाते.
वन कर्मचाऱ्यांसाठीही नियमित आरोग्य तपासणी शिबिरे आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. दुर्गम संरक्षण कुट्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि कल्याणालाही या उपक्रमात प्राधान्य देण्यात आले आहे.
‘मोबाईल हेल्थ युनिट’ उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, बफर क्षेत्रातील सर्व गावांपर्यंत या सेवा पोहोचविण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडून प्रयत्न सुरू आहेत.
“व्याघ्र प्रकल्पालगत राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला दर्जेदार प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असे ताडोबाचे क्षेत्र संचालक प्रभु नाथ शुक्ला यांनी सांगितले.
“हा उपक्रम समुदाय विकास, उत्तम आरोग्यसेवा आणि निसर्ग संवर्धनाबाबतच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. निरोगी आणि सक्षम समुदाय घडविण्याबरोबरच वन्यजीव संवर्धनाच्या दीर्घकालीन उद्दिष्टांना यामुळे हातभार लागत आहे,” असे उर्वी अशोक पिरामल फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि विश्वस्त उर्वी पिरामल यांनी नमूद केले.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव