
चंद्रपूर, 18 जुलै (हिं.स.)। श्री क्षेत्र पंढरपूर येथे 27 जुलै पर्यंत होणाऱ्या आषाढवारी यात्रेनिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक खाजगी तसेच प्रवासी वाहनांद्वारे पंढरपूरकडे रवाना होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या व तेथून परत येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना दि. 6 ते 29 जुलै 2026 या कालावधीत मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पथकर नाक्यांवर पथकरातून सवलत देण्यात आली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार मानाच्या पालख्या, वारकरी तसेच आषाढवारीसाठी जाणाऱ्या भाविकांच्या पात्र वाहनांची आवश्यक कागदपत्रे तपासून विहित नमुन्यात पथकर सवलत पास (टोल पास) -स्टिकर जारी करण्यात येत आहे.यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील आषाढवारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांनी आपल्या वाहनांची आवश्यक कागदपत्रे घेऊन कार्यालयीन वेळेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क साधावा व विहित नमुन्यातील पथकर सवलत पास-स्टिकर प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.आषाढवारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या सर्व पात्र भाविकांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रावसाहेब रागडे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव