
चंद्रपूर, 18 जुलै (हिं.स.) : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीतील प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने महाविद्यालयांना अंतिम मुदतवाढ दिली आहे. मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित अर्जांवर शिष्यवृत्ती मंजूर केली जाणार नसल्याने महाविद्यालयांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांनी केले आहे.
महाडीबीटी प्रणालीअंतर्गत प्रलंबित असलेल्या अर्जांना प्राधान्य देऊन त्यांचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थी स्तरावर तसेच महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांची तपासणी करून विहित मुदतीत मंजुरी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच इतर शिष्यवृत्ती योजना यापूर्वी www.mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवरून राबविण्यात येत होत्या. आता हे पोर्टल बंद करण्यात आले असून, माहिती तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या www.mahadbt2.maharashtra.gov.in या नवीन पोर्टलद्वारे योजना राबविण्यात येत आहेत.
नवीन पोर्टलवर महाविद्यालयाची माहिती, प्राचार्यांचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खाते, ई-मेल, पत्ता तसेच महाविद्यालयाच्या प्रोफाईलमधील सर्व माहिती अचूक आणि अधिकृत स्वरूपात भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असलेल्या (Sent Back to Applicant) अर्जांबाबत, त्रुटींमुळे परत पाठविण्यात आलेल्या अर्जांतील विद्यार्थ्यांशी तातडीने संपर्क साधून आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी. दोन दिवसांच्या आत परिपूर्ण अर्ज प्राप्त करून त्यावर मंजुरीची कार्यवाही पूर्ण करावी. मुदतीत कार्यवाही न झाल्यास संबंधित विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहू शकतात, याची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, असे सांगण्यात आले आहे.
महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांमध्ये प्रथम हप्ता आणि द्वितीय हप्त्यासाठी प्रलंबित अर्जांची त्वरित तपासणी करून पात्र अर्ज पुढील मंजुरीसाठी पाठवावेत. शिष्यवृत्तीच्या नियमांनुसार अपात्र अर्ज बाद करावेत. कोणताही अर्ज महाविद्यालयाच्या लॉगिनवर प्रलंबित ठेवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी दोन दिवसांच्या आत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांवर कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ न मिळाल्यास किंवा शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित विद्यार्थी व महाविद्यालय जबाबदार राहतील, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांनी स्पष्ट केले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव