
अमरावती, 18 जुलै (हिं.स.) : मेळघाटातील जन्मजात गंभीर हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या दोन बालकांवर नागपूर येथील नेल्सन हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत आणि यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दोन्ही बालकांची प्रकृती उत्तम असून त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
धारणी तालुक्यातील रोहिणीखेडा आणि चिखलदरा तालुक्यातील बोदू येथील या बालकांना तातडीने हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता होती. सुरुवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. सोनाली शिरभाते यांनी आवश्यक उपचार करून दोन्ही बालकांची प्रकृती स्थिर केली.
त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) विभाग आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने पालकांचे समुपदेशन करून संपूर्ण उपचार प्रक्रिया नियोजित केली. त्यानुसार नागपूर येथील नेल्सन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दोन्ही बालकांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली.
सध्या दोन्ही बालके पूर्णपणे सुरक्षित असून त्यांची प्रकृती समाधानकारक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
या संपूर्ण उपचार प्रक्रियेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, बालरोगतज्ज्ञ डॉ. सोनाली शिरभाते, डॉ. श्याम गावंडे तसेच आरबीएसके पथकाचे मोलाचे योगदान लाभले.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून गंभीर आजारांनी ग्रस्त बालकांना वेळेत आणि मोफत उपचार उपलब्ध करून देण्याचा हा आणखी एक यशस्वी उपक्रम ठरला असून, यामुळे मेळघाटातील गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी