
डोंबिवली, १८ जुलै (हिं.स.) : डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अति धोकादायक श्रेणीतील पाच कंपन्यांनी त्यांच्या धोकादायक रसायनांचा साठा मोठ्या प्रमाणात कमी केल्यामुळे त्या आता 'अति धोकादायक' श्रेणीत राहिलेल्या नाहीत, असा दावा भाजपा कल्याण जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष तथा कामा संघटनेचे माजी अध्यक्ष देवेन सोनी यांनी केला आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या स्थलांतराचा विषय सध्या उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी डोंबिवली दौऱ्यादरम्यान धोकादायक कंपन्यांच्या प्रश्नाबाबत निवेदन स्वीकारल्यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. त्यानंतर या विषयावर भूमिका स्पष्ट करताना देवेन सोनी यांनी ही माहिती दिली.
त्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी संबंधित कंपन्यांमध्ये महिनाभराचा धोकादायक रसायनांचा साठा ठेवला जात होता. मात्र आता केवळ एक ते दोन दिवसांसाठी आवश्यक तेवढाच साठा ठेवला जात आहे. त्यानुसार रसायनांच्या वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला असून मोठ्या प्रमाणावरील साठवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टोरेज टाक्याही हटविण्यात आल्या आहेत.
या बदलांची माहिती संबंधित कंपन्यांनी लेखी स्वरूपात फॅक्टरी इन्स्पेक्टर विभागाकडे सादर केली असून विभागाने त्याबाबतचा अहवाल तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. मंजुरीनंतर अधिकृत पत्र प्राप्त झाल्यावर या बदलांबाबतची अंतिम स्थिती स्पष्ट होईल, असेही सोनी यांनी सांगितले.
डोंबिवलीतील उद्योगांचे स्थलांतर झाल्यास भविष्यात अंबरनाथ, बदलापूर, तळोजा, तारापूरसह इतर औद्योगिक क्षेत्रांतील उद्योगांच्या स्थलांतराचीही मागणी होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
सरकारला याबाबत माहिती देण्यात आली आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना सोनी म्हणाले की, उद्योग संघटनेकडून एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित सर्व शासकीय विभागांना उद्योगांमधील बदलांची नियमित माहिती दिली जात आहे.
दरम्यान, उद्योग संघटनेने केलेल्या दाव्याला संबंधित शासकीय विभागांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे अंतिम निर्णय आणि अधिकृत भूमिका संबंधित विभागांच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi