
लातूर, 18 जुलै, (हिं.स.)। महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते अहमदपूर तालुक्यातील शिवणखेड खुर्द येथे १ कोटी ६८ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले की, शिवणखेड खुर्द गावाच्या विकासासाठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. भविष्यातही गावाच्या प्रगतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरत शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रुक्सानाबी करीमसाब शेख होत्या. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंदराव सुरवसे, समाजकल्याण सभापती उत्तमराव माने, जिल्हा परिषद सदस्य अश्विन नागराळे, शिवानंद हेंगणे, पंचायत समिती सदस्य कृष्णराज भोसले, रवींद्र बोडके, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रामविकास अधिकारी महेश देवरसे यांच्या प्रास्ताविकाने झाली. समाजकल्याण सभापती उत्तमराव माने यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करून विकासकामांबाबत समाधान व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis