
नाशिक, 18 जुलै (हिं.स.) : नाशिक परिक्रमा मार्ग (रिंग रोड) प्रकल्पांतर्गत बाधित शेतकऱ्यांच्या हरकती, सूचना, मागण्या आणि फेरविचार अर्ज नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित करण्यात आलेल्या विशेष सुनावणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दोन दिवसांच्या सुनावणीत एकूण 264 अर्ज व हरकती प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी दि. 16 व 17 जुलै 2026 रोजी या विशेष सुनावणीचे आयोजन केले होते. भूसंपादन प्रक्रियेशी संबंधित विविध बाबींवर बाधित शेतकऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यात आली.
सुनावणीदरम्यान प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये वाढीव मोबदला, बागायती दर लागू करणे, संपादित क्षेत्रातील दुरुस्ती, पुनर्मोजणी (संयुक्त मोजणी) तसेच जमिनीच्या मूल्यनिर्धारणासंदर्भातील हरकतींचा प्रामुख्याने समावेश आहे.
गेल्या 16 जुलै 2026 रोजी झालेल्या सुनावणीत बेळगाव ढगा (10), राजूर बहुला (3), पिंपळगाव बहुला (12), सारूळ (1), मखमलाबाद (15), विहितगाव (10), मातोरी (7), चांदशी (9), गोवर्धन (4) आणि मुंगसरे (12) या गावांतून एकूण 83 अर्ज व हरकती प्राप्त झाल्या.
17 जुलै 2026 रोजी झालेल्या सुनावणीत ढकांबे (3), वरवंडी (5), आंबेबहुला (1), गौळाणे (11), पाथर्डी (48), पिंपळगाव खांब (10), वडनेर दुमाला (19), पंचक (1), देवळाली (12), आडगाव (31), विंचूरगवळी (12) आणि माडसांगवी (28) येथून एकूण 181 अर्ज व हरकती प्राप्त झाल्या.
महादेवपूर, जलालपूर आणि मानोरी या गावांतून कोणतीही हरकत अथवा अर्ज प्राप्त झाला नाही.
प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची संबंधित विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांमार्फत नियमानुसार छाननी करण्यात येणार असून, पात्र प्रकरणांमध्ये लागू असलेल्या कायद्याच्या तरतुदीनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
भूसंपादन प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सुनावणीमुळे बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या सूचना, हरकती आणि मागण्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाली आहे. प्राप्त अर्जांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV