फेडरल बँकेचा पहिल्या तिमाहीतील नफा ३६.५७ टक्क्यांनी वाढून १,१७७ कोटी रुपयांवर
मुंबई, 18 जुलै (हिं.स.)। फेडरल बँकेने आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून 2026) दमदार कामगिरी नोंदवली असून बँकेचा निव्वळ नफा 36.57 टक्क्यांनी वाढून 1,176.93 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षाच्या याच तिमाहीत बँकेचा नफा 861 क
Federal Bank Q1 Profit Jumps 36.57% to 1,177 Cr


मुंबई, 18 जुलै (हिं.स.)। फेडरल बँकेने आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून 2026) दमदार कामगिरी नोंदवली असून बँकेचा निव्वळ नफा 36.57 टक्क्यांनी वाढून 1,176.93 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षाच्या याच तिमाहीत बँकेचा नफा 861 कोटी रुपयांच्या आसपास होता. बँकेच्या मुख्य व्यवसायातील मजबूत वाढीमुळे ही कामगिरी साध्य झाली असून व्याज उत्पन्न आणि शुल्क आधारित उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.फेडरल बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (नेट इंटरेस्ट इन्कम - एनआयआय) 26.06 टक्क्यांनी वाढून 2,945.89 कोटी रुपये झाले आहे. कर्जवाढीच्या तुलनेत व्याज उत्पन्नातील वाढ अधिक राहिली आहे. बँकेचा निव्वळ व्याज मार्जिन (नेट इंटरेस्ट मार्जिन - एनआयएम) 39 बेसिस पॉइंटने वाढून 3.33 टक्क्यांवर पोहोचला आहे. ठेवींवरील खर्च कमी झाल्यामुळे बँकेच्या नफ्यात सुधारणा झाली आहे.

बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेतही मोठी सुधारणा झाली आहे. निव्वळ एनपीए (नेट नॉन परफॉर्मिंग असेट) 0.18 टक्क्यांवर आला असून ही पातळी मागील दशकातील सर्वात कमी आहे. निव्वळ एनपीएची रक्कम वर्षभरात 56.29 टक्क्यांनी घटून 506.04 कोटी रुपये झाली आहे. एकूण एनपीए (ग्रॉस एनपीए) 1.52 टक्क्यांवर आला असून नवीन कर्ज थकबाकीची प्रकरणे 37.79 टक्क्यांनी कमी झाली आहेत.

बँकेने कर्ज जोखमीपासून संरक्षणासाठी तरतूद कव्हरेज रेशो (प्रोव्हिजन कव्हरेज रेशो - पीसीआर) 87.37 टक्क्यांपर्यंत मजबूत केला आहे. तांत्रिक स्वरूपातील राइट ऑफसह हे प्रमाण 94.23 टक्क्यांवर आहे. यामुळे बँकेची आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाली आहे.

फेडरल बँकेचा एकूण व्यवसाय जवळपास 6 लाख कोटी रुपयांच्या टप्प्यावर पोहोचला असून तो 5,97,615.83 कोटी रुपये झाला आहे. एकूण ठेवी 3,20,117.66 कोटी रुपये असून त्यात 11.37 टक्के वाढ झाली आहे. तर एकूण कर्जवाटप 2,81,239.54 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बचत आणि चालू खाते ठेवी (करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट - कासा) मध्येही चांगली वाढ झाली असून कासा ठेवी 18.26 टक्क्यांनी वाढून 1,03,163.15 कोटी रुपये झाल्या आहेत. कासा प्रमाण 32.23 टक्क्यांवर पोहोचले आहे. अनिवासी भारतीय (एनआर) ठेवींमध्येही 14.24 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

फेडरल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. एस. मनियन यांनी सांगितले की, बँकेचा नफा वाढण्यामागे मुख्य व्यवसायाची ताकद आहे. बाजारातील उत्पन्नावर अवलंबून न राहता व्याज उत्पन्न, कर्ज गुणवत्ता आणि मजबूत ठेवींच्या आधारे बँकेने ही कामगिरी केली आहे. बँकेने व्यावसायिक कर्ज, वाहन कर्ज, गोल्ड लोन, मालमत्तेवर आधारित कर्ज आणि क्रेडिट कार्ड व्यवसायातही चांगली वाढ नोंदवली आहे. तिमाहीत 10 नवीन शाखा सुरू करण्यात आल्या असून बँकेच्या शाखांची संख्या 1,650 वर पोहोचली आहे. मजबूत भांडवल, सुधारलेली मालमत्ता गुणवत्ता आणि वाढता व्यवसाय यामुळे फेडरल बँक आगामी काळासाठी सकारात्मक स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande