
यवतमाळ, 18 जुलै (हिं.स.)| वाहनाचा ‘फास्ट टॅग’ रिचार्ज करण्याच्या नावाखाली एका शिक्षिकेची चक्क सहा लाखांनी फसवणूक केली. हा प्रकार लक्षात येताच शिक्षिका क्रांती दिवाकर राऊत (वय ४६, रा. बोरले ले-आउट, यवतमाळ) यांनी सायबर सेलकडे ऑनलाइन तक्रार केली. विशेष म्हणजे दोन वेगवेगळ्या खात्यातून ही रक्कम काढण्यात आली. बाभूळगाव तालुक्यातील गव्हाळा जिल्हा परिषद शाळेत क्रांती राऊत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, चारचाकी वाहन (क्र. एमएच २९, आर - २५३०) चालवत आहेत. त्या वाहनाचा ‘फास्ट टॅग’ रिचार्ज करण्याच्या उद्देशाने पाच मे २०२६ ला कस्टमअर केअरच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला. त्यात एका अनोळखी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्या मोबाईलवर बोलणाऱ्यांनी ‘कस्टमर सपोर्ट अॅप’ डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्यानंतर अॅप डाऊनलोड करून माहिती भरण्यास सुरवात केली. काही माहिती भरताच नेटवर्कची समस्या उद्भवली. परिणामी, संपूर्ण माहिती भरता आलीच नाही. त्यामुळे दुसर्या दिवशी सकाळी माहिती भरण्याचा प्रयत्न केला, बाभूळगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि यवतमाळच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया या दोन बँक खात्याची माहिती भरली. परंतु रिचार्ज झालाच नव्हता. त्याचवेळी एका अनोळखी क्रमांकावरून कॉल करून व्यक्तीने फास्ट टॅग रिचार्ज करीत आहे, का अशी विचारणा केली. त्यानंतर बँक खात्याची माहिती, आधारकार्ड, पॅनकार्ड बाबत संपूर्ण माहिती घेतली. तर फास्ट टॅग रिचार्ज झाल्याची बतावणी केली. परंतु रात्री यवतमाळच्या सेंट्रल बँकेच्या खात्यातून ९५ हजार आणि चार हजार ९९९ रुपये, असे ९९ हजार ९९९ रुपयांचे विड्रॉल झाल्याचा मॅसेज आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच क्रांती राऊत यांनी अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर थोड्याचवेळात बाभूळगाव शाखेतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून पाच लाख रुपये विड्रॉल झाल्याचे लक्षात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून शिक्षिका क्रांती राऊत यांनी सायबर सेल गाठून फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी