
सोलापूर, 18 जुलै, (हिं.स.)। आषाढी वारीनिमित्त शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारी सोलापूर शहरात टाळ-मृदुंगाच्या गजरात, गण गण गणात बोतेच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. रूपा भवानी चौक येथे पालखीचे आगमन होताच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल व धनश्री कोंड्याल यांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, शहर सुधारणा सभापती स्वाती बडगु, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, उपायुक्त सोनाली यादव यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी, भाविक आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले संत श्री गजानन महाराज पालखीचा सोलापूर शहरात मुक्काम असून सुमारे ७०० वारकरी या पालखीसोबत आहेत. त्यांच्या मुक्कामादरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी महानगरपालिकेने सर्व विभागांना सतर्क ठेवत २४ तास सेवा व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
पालखी मार्गावरील रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती, विशेष स्वच्छता मोहीम, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य सेवा, प्रकाश व्यवस्था, कचरा व्यवस्थापन तसेच मुक्कामासाठी कुचन प्रशाला व इतर मंगल कार्यालयांमध्ये सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी महापौर कोंड्याल म्हणाले, संत श्री गजानन महाराजांची पालखी ही श्रद्धा, सेवा, समता आणि एकात्मतेचा संदेश देणारी प्रेरणादायी परंपरा आहे. सोलापूरमध्ये येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि सर्व सुविधांनी युक्त वातावरण मिळावे, ही महानगरपालिकेची जबाबदारी असून त्यासाठी सर्व विभागांचा समन्वय साधून व्यापक नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पालखी सोहळ्यादरम्यान शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती दिली. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
संत श्री गजानन महाराजांच्या पालखीच्या आगमनाने सोलापूर शहर संपूर्णपणे भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले असून गण गण गणात बोतेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड