
बीड, 18 जुलै (हिं.स.) : केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या १८ वर्षीय गोरख महावीर हजारे यांच्या निर्घृण खून प्रकरणात केज येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला भारतीय दंड विधान कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आरोपीला आणखी एक वर्षाचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.
केज शहरातील वसंत विद्यालयाजवळील क्रांतीनगर परिसरात २३ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगे (रा. क्रांतीनगर, केज) याने शर्टमध्ये लपवून ठेवलेल्या धारदार शस्त्राने गोरख हजारे यांच्या गळ्यावर वार केले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गोरख यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मयताचे नातेवाईक राज संजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि आनंद शिंदे यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत आरोपीला बोबडेवाडी येथील शेतातून ताब्यात घेतले होते. पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
केज येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सत्र न्यायाधीश श्रीमती आर. के. शेख यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील ॲड. राम बिरंगळ यांनी सादर केलेले पुरावे तसेच पाच साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis