रत्नागिरी : मुर्शी ते आंबा घाट मार्गावर साखरपा महाविद्यालयाचा हरित संकल्प
रत्नागिरी, 18 जुलै (हिं.स.) । प्रा. आबा सावंत कला व वाणिज्य महाविद्यालय (साखरपा, ता. संगमेश्वर) येथे मुंबई विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. मुर्शी ते आंबा घाट मार्गावर हरित संकल्प हा त्यातील प्रमुख कार्यक्रम होता. वृक्षार
साखरपा महाविद्यालयाचा हरित संकल्प


रत्नागिरी, 18 जुलै (हिं.स.) । प्रा. आबा सावंत कला व वाणिज्य महाविद्यालय (साखरपा, ता. संगमेश्वर) येथे मुंबई विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. मुर्शी ते आंबा घाट मार्गावर हरित संकल्प हा त्यातील प्रमुख कार्यक्रम होता.

वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. आबा सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मुर्शी ते आंबा घाट या परिसरात सीड्स बॉल रोपण व महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी रस्त्यालगत तसेच डोंगराळ भागात विविध देशी वृक्षांच्या बियांचे सीड्स बॉल मोठ्या प्रमाणावर विखुरले. यासोबतच महाविद्यालय परिसरात विविध वृक्षांचे रोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला.

यावेळी पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे जतन आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा.शिल्पा वैद्य यांनी केले. सीड्स बॉल तंत्रामुळे दुर्गम भागातही नैसर्गिकरीत्या वृक्षांची वाढ होण्यास मदत होते, अशी माहिती कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद झेपले यांनी स्वयंसेवकांना दिली. प्रा. सूरज लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी महामार्गाच्या दुतर्फा सीड्स बॉल रोपण केले.

या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रा.आबा सावंत, उपप्राचार्या प्रा.शिल्पा वैद्य, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा प्रसाद झेपले आणि प्रा. सोनाली पवार, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्वांच्या सहभागामुळे परिसरात पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश पोहोचला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande