
कोल्हापूर, 18 जुलै (हिं.स.) : ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघाची तिमाही आढावा बैठक सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीत राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच इतर आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आरोग्य संस्थांमधील मनुष्यबळाची उपलब्धता, रिक्त पदे, औषधसाठा, वैद्यकीय उपकरणे, प्रयोगशाळा सुविधा, 108 रुग्णवाहिका सेवा, रेफरल व्यवस्था आणि पायाभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, ‘आपला दवाखाना’ तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावाही घेण्यात आला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस आणि अतिसार यांसारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, आरोग्य सेवा ही शासनाची महत्त्वाची लोककल्याणकारी सेवा असून प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती गावागावातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, तसेच कोणताही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी, शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतींची संख्या वाढविणे आणि कर्करोगाच्या लवकर निदानासाठी विशेष तपासणी शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता, औषधांची उपलब्धता, वेळेवर उपचार आणि रुग्णांशी संवेदनशील संवाद यावर विशेष भर देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
बैठकीत लोकप्रतिनिधींनी ई-संजीवनी, टेली मेडिसिन, आरोग्य केंद्रांच्या सुविधा आणि मनुष्यबळाशी संबंधित विविध प्रश्न मांडले. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, विविध विभागांचे अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. बैठकीतील निर्णयांची कालबद्ध अंमलबजावणी करून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar