
बीड, 18 जुलै (हिं.स.) : बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केज शहरात झालेल्या एका बालविवाहानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणी पतीसह सासू-सासरे आणि पीडितेच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केज शहरातील १७ वर्षे ८ महिने वयाच्या मुलीचा विवाह नातेवाईकांच्या संमतीने कळंब तालुक्यातील एका तरुणासोबत लावून देण्यात आला होता. हा विवाह केज येथील मंगल कार्यालयात पार पडला होता. विवाहानंतर काही दिवसांनी पती तिला मुंबई येथील मालाड परिसरात घेऊन गेला.
तेथे अल्पवयीन पत्नीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेने विरोध केल्यानंतर तिच्यावर दबाव आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती एका जागरूक नागरिकाने चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर दिल्यानंतर महिला व बालविकास विभागाने तातडीने दखल घेतली. महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत जाऊन पीडितेशी संवाद साधला आणि तिला विश्वासात घेतले.
यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने कुरार पोलिसांनी शून्य क्रमांकाने गुन्हा नोंदवून तपासासाठी तो केज पोलिसांकडे वर्ग केला.
केज पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे तसेच पीडितेच्या आई-वडिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके पुढील तपास करीत आहेत.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis