
नाशिक, 18 जुलै (हिं.स.) : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हिंसक हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्रने सोमवार, 20 जुलै 2026 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तास राज्यभर नियमित आरोग्यसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील सुमारे 8 ते 10 हजार डॉक्टर सहभागी होणार आहेत.
आंदोलनादरम्यान नियमित बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि नियोजित वैद्यकीय सेवा बंद राहणार असल्या तरी आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग (आयसीयू), प्रसूती सेवा आणि जीवनावश्यक उपचार सुरू राहणार असल्याचे आयएमएने स्पष्ट केले आहे. या आंदोलनात आधुनिक वैद्यक, आयुर्वेद, होमिओपॅथीसह विविध वैद्यकीय शाखांतील डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे.
आयएमए नाशिक आणि इतर वैद्यकीय संघटनांनी स्पष्ट केले की, हा बंद रुग्णांविरोधात नसून आरोग्यसेवा क्षेत्र हिंसामुक्त करण्यासाठी, डोंबिवली हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानजनक कार्यस्थळ मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे.
आयएमए महाराष्ट्रने शासनाकडे डोंबिवली हल्ल्यातील आरोपींवर कठोर आणि निष्पक्ष कारवाई, मेडिकेअर कायद्यात प्रभावी दुरुस्ती, रुग्णालयांमध्ये 24x7 कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था, आरोग्य संस्थांमधील राजकीय हस्तक्षेप रोखणे, आरोग्यसेवेवरील हिंसाचाराबाबत 'शून्य सहनशीलता' धोरणाची अंमलबजावणी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर केंद्रीय कायदा करण्याची मागणी केली आहे.
आयएमएने इशारा दिला आहे की, शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास 9 ऑगस्ट 2026 पासून महाराष्ट्रभर बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल.
या पत्रकार परिषदेला आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. विशाल पवार, डॉ. पंकज भाट, डॉ. मयूर सरोदे, डॉ. स्वप्नील खैरनार, डॉ. अमोल वाजे, डॉ. प्रतिभा वाघ, डॉ. विजय मुंदडा, डॉ. सचिन देवरे, डॉ. स्वप्ना महाले आणि डॉ. तुषार सूर्यवंशी यांच्यासह विविध वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या आंदोलनात इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पंचवटी मेडिकल असोसिएशन, सातपूर मेडिकल असोसिएशन, देवळाली मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स, नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच इंडियन डेंटल असोसिएशनसह विविध वैद्यकीय संघटनांचा सहभाग राहणार आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV