
अमरावती, 18 जुलै (हिं.स.) : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सलग दोन दिवस सर्व प्रकारची मांसविक्री बंद ठेवावी, तसेच बेकायदेशीर मांसविक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी प्रदीप गर्गे, रमेश वरुडकर, सुनील जासुदकर, बाबूराव कोकाटे, सौरभ सोनटक्के, सचिन वैद्य, अनुप जैस्वाल, पृथ्वीराज बोके, ऋषिकेश ठेलकर, कवलजीत पांडे, सोनू साहू आदी उपस्थित होते.
निवेदनात आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व चिकन, मटन तसेच इतर मांसविक्रीची दुकाने आणि उघड्यावर मांसविक्री करणाऱ्या गाड्या दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश तातडीने जारी करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच सार्वजनिक रस्ते, मुख्य चौक, रहिवासी भाग तसेच शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात सुरू असलेली मांसविक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर, दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी. शहरातील बाजारपेठांमध्ये उघड्यावर होणाऱ्या मांसविक्रीमुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
तसेच सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे, प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा तसेच अन्न सुरक्षा नियमांचे अनेक ठिकाणी उल्लंघन होत असल्याचा आरोपही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी