समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी कालवश
पुणे, 18 जुलै (हिं.स.) : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद)चे संस्थापक व माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचे आज, शनिवारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने समाज
डॉ. कुमार सप्तर्षी यांचे संग्रहित छायाचित्र


पुणे, 18 जुलै (हिं.स.) : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद)चे संस्थापक व माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचे आज, शनिवारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने समाजवादी चळवळीतील एक अभ्यासू, प्रखर नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. डॉ. कुमार सप्तर्षी यांचे पार्थिव सोमवारी कोथरूड येथील गांधी भवनमधील गांधी स्मारक भवन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात समाजवादी विचारसरणी रुजविण्यासाठी आणि युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी डॉ. सप्तर्षी यांनी आयुष्यभर कार्य केले. 1960-70 च्या दशकात त्यांनी ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद)ची स्थापना करून युवकांना संघटित केले. या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला अनेक अभ्यासू, संवेदनशील आणि संघर्षशील कार्यकर्ते मिळाले. गांधीवादी आणि समाजवादी विचारधारेचे खंदे पुरस्कर्ते असलेल्या डॉ. सप्तर्षी यांनी सामाजिक विषमता, अन्याय, भ्रष्टाचार आणि लोकशाही मूल्यांच्या ऱ्हासाविरोधात सातत्याने आवाज उठविला. सत्याग्रह, लोकसहभाग आणि विधायक परिवर्तन या तत्त्वांवर त्यांचा दृढ विश्वास होता. विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक चळवळीशी जोडलेल्या डॉ. सप्तर्षी यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय आयुष्यात अनेक आंदोलने केली. 9 ऑगस्ट 1977 रोजी त्यांनी चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर 1978 मध्ये जनता पक्षाच्या उमेदवारीवर ते अहमदनगरमधून आमदार म्हणून निवडून आले होते.

डॉ. कुमार सप्तर्षी हे प्रभावी लेखक, अभ्यासू वक्ते आणि विचारवंत म्हणूनही प्रसिद्ध होते. ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले. सामाजिक, राजकीय आणि वैचारिक विषयांवरील त्यांचे लेखन अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरले.गेल्या काही वर्षांतही विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर त्यांनी सडेतोड भूमिका मांडत समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande