
नाशिक, 18 जुलै (हिं.स.) : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळा नसून प्रादेशिक अर्थव्यवस्थेला गती देणारा आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारा महाउत्सव ठरणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंट (एसआयओएम), नाशिक येथे आयोजित ‘सुशासन, अर्थव्यवस्था आणि कुंभ व्यवस्थापन’ या विशेष परिसंवादात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. एसआयओएमच्या संचालिका डॉ. वंदना सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला केपीएमजीचे असोसिएट डायरेक्टर प्रितम देशमुख, असिस्टंट मॅनेजर सौम्यजित मंडल, स्पेशालिस्ट अक्षय भोईटे, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सार्वजनिक प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, शासन व्यवस्थेचे उद्दिष्ट केवळ आर्थिक वृद्धी साधणे नसून सामाजिक कल्याण, समावेशक विकास आणि संसाधनांचे न्याय्य वितरण सुनिश्चित करणे हे आहे. देशाच्या प्रगतीचे मूल्यमापन केवळ जीडीपी किंवा बाजारमूल्यावर न करता समाजातील संधी आणि संसाधनांचे समान वितरण कितपत झाले, यावरही केले पाहिजे. यासाठी त्यांनी ‘जिनी गुणांक’ या संकल्पनेचा संदर्भ देत समावेशक विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आर्थिक परिणामांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, कुंभमेळा हा अध्यात्म, अर्थव्यवस्था आणि आधुनिक ऑपरेशन्स मॅनेजमेंट यांचा संगम आहे. या महाउत्सवामुळे स्थानिक व्यापार, पर्यटन, सेवा क्षेत्र आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार असून, प्रादेशिक अर्थव्यवस्थेत भांडवल आणि रोख प्रवाह वाढण्यास मदत होईल.
कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर भागधारकांमधील प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. केन्सियन आर्थिक विकास सिद्धांताचा संदर्भ देत त्यांनी मोठ्या सार्वजनिक आयोजनांच्या आर्थिक परिणामांवर प्रकाश टाकला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी संशोधन, सल्लागार प्रकल्प आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांच्या माध्यमातून कुंभमेळ्याशी संबंधित प्रशासकीय आव्हानांवर काम करण्याचे आवाहन केले. जीआयएस (GIS), मॅटलॅब (MATLAB), एसपीएसएस (SPSS) आणि ट्रॅफिक सिम्युलेशन यांसारख्या आधुनिक विश्लेषणात्मक साधनांचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत (NTKMA) विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि सल्लागार प्रकल्पांच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
केपीएमजीचे असोसिएट डायरेक्टर प्रितम देशमुख यांनी भारताच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाचा आढावा घेत देशाची ३० ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्थेकडे सुरू असलेल्या प्रवासावर भाष्य केले. कृषी, द्राक्ष व वाइन उद्योग तसेच बहुआयामी लॉजिस्टिक्स कनेक्टिव्हिटीमुळे नाशिकची आर्थिक क्षमता अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाधारित प्रशासन, सक्षम आपत्कालीन यंत्रणा आणि विकेंद्रित व्यवस्थापनाच्या माध्यमातून ‘व्हिजन २०४७’ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या परिसंवादात विद्यार्थ्यांनी सुशासन, सार्वजनिक धोरण, आर्थिक विकास, लॉजिस्टिक्स आणि कुंभ व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर मान्यवरांशी संवाद साधत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. व्यवस्थापन शिक्षण, सार्वजनिक प्रशासन आणि प्रादेशिक आर्थिक विकास यांचा परस्परसंबंध स्पष्ट करणारा हा परिसंवाद विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि ज्ञानवर्धक ठरला.-----------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV