
बीड, 18 जुलै, (हिं.स.)। लोककल्याणकारी सेवा पंधरवडा अंतर्गत आज परळी वैजनाथ नगर परिषद आयोजित ग्रंथदान अभियानाचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षांनी विविध विषयांवरील ६५ दर्जेदार पुस्तके डॉ. भालचंद्र सार्वजनिक वाचनालयास भेट देत अभियानाची प्रेरणादायी सुरुवात केली. यानिमित्त त्यांनी परळीकर नागरिकांना आपल्या घरातील उपयुक्त, दर्जेदार पुस्तके ग्रंथालयाला दान करून ज्ञानाची ही चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक संदर्भग्रंथ व पुस्तकांचे संच नगर परिषदेमार्फत टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येतील. ज्ञानसंपन्न आणि स्पर्धात्मक परळी घडविण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे.
या प्रसंगी शिक्षण व सांस्कृतिक सभापती योगेशभैय्या मेनकुदळे, नगरसेवक अनंत इंगळे, अभिजीत आघाव डॉ.भालचंद्र सार्वजनिक वाचनालयाचे कर्मचारी तसेच पुस्तकप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis