मसुदा पाठवून जबाबदारी झटकणाऱ्या बिल्डरला महारेराचा दणका
तीस दिवसांत कन्व्हेअन्स डीड अंतिम करण्याचे, तर पुढील ३० दिवसांत नोंदणीचे आदेश पुणे, १८ जुलै (हिं.स.) : कन्व्हेअन्स डीडची जबाबदारी टाळत केवळ त्याचा मसुदा सोसायटीकडे पाठवून कर्तव्य पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या बिल्डरला महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक
मसुदा पाठवून जबाबदारी झटकणाऱ्या बिल्डरला महारेराचा दणका


तीस दिवसांत कन्व्हेअन्स डीड अंतिम करण्याचे, तर पुढील ३० दिवसांत नोंदणीचे आदेश

पुणे, १८ जुलै (हिं.स.) : कन्व्हेअन्स डीडची जबाबदारी टाळत केवळ त्याचा मसुदा सोसायटीकडे पाठवून कर्तव्य पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या बिल्डरला महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) दणका दिला आहे.

किवळे येथील निर्माण माईलस्टोन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या तक्रारीवर सुनावणी करताना महारेराने बिल्डर निर्माण व्हेंचरला ३० दिवसांच्या आत कन्व्हेअन्स डीडचा मसुदा अंतिम करण्याचे आणि त्यानंतर पुढील ३० दिवसांत सोसायटीच्या नावे दस्ताची नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत.

किवळे येथील निर्माण माईलस्टोन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने ॲड. अजित बोराडे यांच्यामार्फत महारेराकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात महारेराचे सदस्य महेश पाठक यांनी आदेश पारित केला.

रेरा कायद्याच्या कलम १७ नुसार सोसायटीच्या नावे कन्व्हेअन्स करणे ही प्रवर्तक अर्थात बिल्डरची वैधानिक जबाबदारी आहे. केवळ कन्व्हेअन्स डीडचा मसुदा सोसायटीला पाठविल्याने ही जबाबदारी पूर्ण होत नाही, असे महारेराने स्पष्ट केले.

तसेच बिल्डर आणि जमीनमालक यांच्यात कोणताही वाद असला, तरी त्याचा आधार घेऊन विकासक आपल्या कायदेशीर जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही, असेही महारेराने आदेशात नमूद केले आहे.

विकसकाने सोसायटीला पाठविलेल्या कन्व्हेअन्स डीडच्या मसुद्यात नमूद केलेले क्षेत्र मंजूर नकाशे आणि प्रकल्प नोंदणीतील क्षेत्रापेक्षा कमी असल्याचा आक्षेप सोसायटीने घेतला होता. यावर निर्णय देताना महारेराने बिल्डरला मंजूर नकाशे व प्रकल्प नोंदणीतील क्षेत्रानुसार सर्व सामाईक क्षेत्रे, सामाईक मार्ग तसेच त्यावरील अविभाज्य हक्क सोसायटीकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत.

महारेराच्या या आदेशामुळे सोसायट्यांच्या कन्व्हेअन्स डीड प्रक्रियेत बिल्डरांची जबाबदारी अधिक स्पष्ट झाली आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande