बीटीएस परीक्षेत स्वरा मसुरेचे उल्लेखनीय यश; राज्य गुणवत्ता यादीत 257 वा क्रमांक
रायगड, 18 जुलै (हिं.स.) : माणगाव तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर मसुरे यांची कन्या आणि राजिप विकास कॉलनी शाळा, माणगाव येथील विद्यार्थिनी कु. स्वरा मसुरे हिने भारत टॅलेंट सर्च (BTS) परीक्षा 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन
Ms. Swara Masure makes a mark in the state merit list for the BTS exam; showered with praise from all quarters.


रायगड, 18 जुलै (हिं.स.) : माणगाव तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर मसुरे यांची कन्या आणि राजिप विकास कॉलनी शाळा, माणगाव येथील विद्यार्थिनी कु. स्वरा मसुरे हिने भारत टॅलेंट सर्च (BTS) परीक्षा 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीत तिने 257 वा क्रमांक पटकावून माणगाव तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा ठसा उमटवला आहे.

स्वराच्या या यशामुळे माणगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रेयश कुलकर्णी तसेच राजिप विकास कॉलनी शाळेच्या मुख्याध्यापिका पूर्वा येलवे यांनी तिचे विशेष अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शाळेतील शिक्षक, पालक, मित्रपरिवार आणि नागरिकांनीही स्वराच्या यशाचे कौतुक केले आहे. स्वरा ही अभ्यासू, होतकरू आणि बहुगुणी विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते. अभ्यासासोबतच तिने विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये प्रभावी भाषणांद्वारे आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

वडील प्रभाकर मसुरे यांच्या प्रभावी वक्तृत्वाचा आदर्श समोर ठेवत स्वराने अनेक व्यासपीठांवर प्रभावी सादरीकरण केले आहे. राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले आणि राणी लक्ष्मीबाई यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या वेशभूषेतून त्यांच्या कार्याचा आणि राष्ट्रासाठीच्या योगदानाचा परिचय विद्यार्थ्यांना करून देत तिने प्रेरणादायी विचार समाजापर्यंत पोहोचवले आहेत.

तिच्या भाषणांमध्ये देशप्रेम, संस्कार, शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश ठळकपणे दिसून येतो. चौथीच्या इयत्तेत शिक्षण घेत असताना अथक परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर तिने बीटीएस परीक्षेत हे यश मिळविले आहे.

स्वराच्या या यशामुळे तिच्या कुटुंबासह शाळेचा आणि माणगाव तालुक्याचा नावलौकिक वाढला असून भविष्यातही ती यशाची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास सर्व स्तरांतून व्यक्त केला जात आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande