बीड : नीट परीक्षेच्या निकालातील तांतिक घोटाळ्याचा फटका, चौकशीची मागणी
बीड, 18 जुलै (हिं.स.) : देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट यूजी 2026 परीक्षेच्या पुनर्परीक्षेच्या निकालावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या निकालात अनेक विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये अधिकृत उत्तरतालिकेच्या तुलने
नीट परीक्षा प्रतिकात्मक फोटो


बीड, 18 जुलै (हिं.स.) : देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट यूजी 2026 परीक्षेच्या पुनर्परीक्षेच्या निकालावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या निकालात अनेक विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये अधिकृत उत्तरतालिकेच्या तुलनेत मोठी तफावत आढळून आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)च्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

गेल्या 3 मे रोजी झालेल्या मूळ परीक्षेदरम्यान पेपरफुटीच्या आरोपांनंतर 21 जून रोजी पुनर्परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, पुनर्परीक्षेच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषण सुरू केले आहे. तसेच, एनटीएवरील विश्वास कमी झाल्यामुळे यंदाच्या पुनर्परीक्षेला तब्बल 2.79 लाख विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याचेही समोर आले आहे.

या वादाचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना बसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. वडवणी येथील विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी अनिलकुमार पवार हिने अधिकृत उत्तरतालिकेनुसार 720 पैकी 702 गुण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, अंतिम स्कोअरकार्डमध्ये तिला केवळ 87 गुण मिळाल्याचे दिसून आले. यामुळे तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, चुकीची ओएमआर शीट जोडली गेल्याचा आरोप करत एनटीएने सर्व विद्यार्थ्यांच्या ओएमआर शीट पारदर्शकपणे उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी तिच्या पालकांनी केली आहे.

तसेच, बीडमधीलच सोहम नितीन गवते यालाही उत्तरतालिकेनुसार 522 गुण अपेक्षित असताना अंतिम निकालात केवळ 95 गुण मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे तो मानसिक तणावाखाली असून, त्याच्या कुटुंबीयांनीही निकालातील तांत्रिक त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. अन्यथा न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, निकालातील कथित तांत्रिक त्रुटींची सखोल चौकशी करून पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी देशभरातील विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांकडून जोर धरत आहे. एनटीएकडून या आरोपांबाबत अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande