लातूर - बिझनेस लोनचे आमिष दाखवून ४.५३ लाखांची ऑनलाइन फसवणूक
लातूर, 18 जुलै (हिं.स.)। बिझनेस लोन मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत पाच वेगवेगळ्या सिमकार्डच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १२ नागरिकांची तब्बल ४ लाख ५३ हजार ८६ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आ
बनावट सीम कार्ड


लातूर, 18 जुलै (हिं.स.)। बिझनेस लोन मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत पाच वेगवेगळ्या सिमकार्डच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १२ नागरिकांची तब्बल ४ लाख ५३ हजार ८६ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनसीसीआरपी (राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल) वरील तक्रारींच्या छाननीत हा प्रकार उघडकीस आला.

लातूर जिल्हा पोलीस सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध ऑनलाइन पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची नियमित तपासणी करत आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसीआरपी पोर्टलवरील तक्रारींची पडताळणी करण्यात आली असता मोबाईल क्रमांक ८४४६३७७५०० व इतर काही क्रमांकांविरुद्ध एकूण १२ तक्रारी आढळून आल्या. तपासात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील नागरिकांची ₹४,५३,०८६ इतक्या रकमेची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.

या फसवणुकीचे बळी ठरलेल्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील चार, पुणे जिल्ह्यातील नारायणगाव, पिंपरी, लोणी काळभोर, चिखली आणि विश्रांतवाडी येथील पाच, सांगली जिल्ह्यातील मिरज येथील एक, मुंबईतील कस्तुरबा येथील एक तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील एका नागरिकाचा समावेश आहे.

तपासादरम्यान शुभम रहीशचंद्र पिचारे (रा. येरोळे, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) याने ही फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी हा २०२१-२२ या कालावधीत एका कॉल सेंटरमध्ये कार्यरत होता. त्या अनुभवाचा गैरफायदा घेत त्याने नागरिकांना बिझनेस लोन मंजूर करून देतो असे सांगून प्रक्रिया शुल्क, फाईल चार्जेस, विमा, जीएसटी आदी विविध कारणे पुढे करत पैसे भरायला लावले. नागरिकांकडून पैसे उकळण्यासाठी आरोपीने पाच वेगवेगळ्या सिमकार्डांचा वापर केल्याचे तपासात समोर आले.

या प्रकरणी पोलीस अमलदार विनय उबाळे यांच्या फिर्यादीवरून शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५५/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रायभोळे करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, या कलमान्वये दोषी आढळल्यास आरोपीला सात वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.

दरम्यान, लातूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ऑनलाइन कर्ज मंजुरीच्या नावाखाली कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर आगाऊ रक्कम जमा करू नये. मोबाईलवर आलेल्या लिंक, संदेश किंवा फोन कॉलवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची खातरजमा करावी. फसवणुकीचा संशय आल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande