
यवतमाळ, 18 जुलै (हिं.स.) : जिल्ह्यातील झरी-जामणी तहसील कार्यालय परिसरात जागतिक संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ‘वुली-नेक्ड स्टॉर्क’ या दुर्मीळ पक्ष्याचे दर्शन घडले आहे. राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. प्रणव भोयर यांनी या पक्ष्याचे छायाचित्र टिपून त्याची शास्त्रीय नोंद केली आहे.
आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या (IUCN) रेड लिस्टमध्ये या पक्ष्याचा समावेश धोक्याच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रजातींमध्ये करण्यात आला आहे. जगभरात या पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याने त्याचे दर्शन आणि शास्त्रीय दस्तऐवजीकरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
‘वुली-नेक्ड स्टॉर्क’ हा पाणथळ परिसंस्थेचा जैव-सूचक (बायो-इंडिकेटर) पक्षी मानला जातो. मासे, बेडूक, साप, खेकडे तसेच इतर जलचरांवर उपजीविका करणारा हा पक्षी अन्नसाखळीचे संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे या पक्ष्याची उपस्थिती परिसरातील जलस्रोत, आर्द्रभूमी आणि पर्यावरणीय गुणवत्ता चांगली असल्याचे सकारात्मक संकेत मानले जातात.
विशेष म्हणजे, मानवी वर्दळ असलेल्या झरी-जामणी तहसील कार्यालय परिसरात या दुर्मीळ पक्ष्याचे दर्शन घडणे ही निसर्गप्रेमींसाठी आनंदाची बाब ठरली आहे. हवामान बदल, आर्द्रभूमींचे घटते क्षेत्र, अधिवासांचा ऱ्हास आणि वाढते प्रदूषण यामुळे जलपक्ष्यांवर संकट वाढत असताना ही नोंद अधिक महत्त्वपूर्ण ठरत आहे.
पर्यावरण अभ्यासकांच्या मते, दुर्मीळ प्रजातींच्या स्थानिक नोंदी केवळ छायाचित्रांपुरत्या मर्यादित नसून भविष्यातील संवर्धन धोरणांसाठी महत्त्वाचा आधार ठरतात. झरी-जामणी परिसरातील ‘वुली-नेक्ड स्टॉर्क’ची ही नोंद विदर्भाच्या जैवविविधतेच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
या दुर्मीळ पक्ष्याच्या दर्शनामुळे पक्षीप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी