
रत्नागिरी, 18 जुलै (हिं.स.) । लांज्यात केळंबे विभूते स्टॉप (तेलीवाडी) येथे आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रिक्षा आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात रिक्षातील तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लांजा वैभव वसाहत येथील रहिवासी प्रशांत नारायण वाघधरे (वय ६५) हे आपली रिक्षा (क्र. एमएच ०८ एक्यू १८९०) घेऊन पत्नी पल्लवी प्रशांत वाघधरे (वय ६०) आणि नातू पार्थ पिरितोष वाघधरे (वय २) यांना घेऊन लांज्याहून विवलीला निघाले होते. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते केळंबे येथे पोहोचले असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसने (क्र. एमएच ०८ बीटी २६६७) रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रशांत वाघधरे, पल्लवी वाघधरे आणि लहानगा पार्थ हे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी