
बीड, 18 जुलै (हिं.स.) : अंबाजोगाई येथील आधार माणुसकी आणि विद्यार्थी विकास योजनेच्या संयुक्त विद्यमाने बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शालेय विद्यार्थ्यांना रविवारी (दि. १९) ‘स्कूल किट’चे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळाही आयोजित करण्यात आला आहे.
अंबाजोगाई येथील आर्यवीर मंगल कार्यालयात रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. विद्यार्थी विकास योजनेचे संस्थापक रविंद्र कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडणार आहे.
कार्यक्रमाला बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान, पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश शिंदे, पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब जाधव, विद्यार्थी विकास योजनेचे अध्यक्ष संजीव करंदीकर, गंगा माऊली शुगरचे अध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, रुई धारूर येथील दादाराव कराड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कार्यकारी संचालिका आशा बालासाहेब कराड, बीड येथील ब्रह्मकुमारी प्रज्ञा दीदी, वकील संघाचे अध्यक्ष अशोक कवडे, संभाजी राजे स्कूलचे संचालक परमेश्वर भिसे आणि आई हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. सुनीता तोंडगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आधार माणुसकीच्या उपक्रमांतर्गत मागील दहा वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. विद्यार्थी विकास योजनेच्या सहकार्याने गरजू, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतही केली जाते.
या आर्थिक मदतीच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या २१ विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आधार माणुसकी उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी केले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis