
अमरावती, 18 जुलै (हिं.स.) : राज्यात क्रीडा क्षेत्राच्या विकासावर भर दिला जात असला तरी अनेक शाळांमध्ये मूलभूत क्रीडा साहित्याचा अभाव आणि शालेय स्पर्धांसाठी अपुरे अनुदान ही गंभीर समस्या कायम असल्याचे चित्र आहे. यामुळे ग्रामीण व शहरी भागातील अनेक गुणवंत खेळाडूंना संधी मिळण्यास अडथळे निर्माण होत असून, शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि शारीरिक शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण, आवश्यक क्रीडा साहित्य आणि स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पुरेसे आर्थिक पाठबळ मिळाल्यास राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडू शकतात. मात्र अनेक शाळांमध्ये क्रीडा साहित्याची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांना नियमित सराव करणेही कठीण होत असून, त्याचा त्यांच्या कामगिरीवर परिणाम होत आहे.
याशिवाय शाळास्तरीय स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या संघांना तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय स्पर्धांसाठी बाहेरगावी जाण्याकरिता आवश्यक आर्थिक मदत मिळत नसल्याने अनेक ठिकाणी शिक्षकांना स्वतः वर्गणी गोळा करून खेळाडूंना स्पर्धेसाठी पाठवावे लागत असल्याची परिस्थिती आहे.
प्रवास, निवास आणि इतर खर्चासाठी पुरेशा निधीअभावी खेळाडूंना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.
शाळांना पुरेसे क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी प्रवासभत्ता व इतर आवश्यक खर्चासाठी स्वतंत्र क्रीडा अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
यासंदर्भात शारीरिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब खडके म्हणाले की, शाळा स्तरावर विजयी झालेल्या संघांना पुढील स्पर्धांसाठी शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान मिळत नाही. अनेक शाळांमध्ये पुरेसे क्रीडा साहित्यही उपलब्ध नसते. प्रत्येक शाळेला आवश्यक क्रीडा साहित्य आणि तालुका, जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरीय स्पर्धांसाठी स्वतंत्र क्रीडा अनुदान देणे अत्यंत गरजेचे आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी