
बीड, 18 जुलै (हिं.स.) : परळी तालुक्यातील मोहा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या कामाप्रकरणी आणि काही कामे न करताच निधी उचलल्याच्या आरोपात दोषी ठरलेल्या सात कंत्राटदारांना लवकरच काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
माजलगाव येथील उपअभियंत्यांच्या समितीने केलेल्या चौकशीत या कामात तब्बल 86 लाख रुपयांची अनियमितता आढळून आली होती. त्यानंतर संबंधित कंत्राटदारांनी केलेला दावा फेटाळून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुनर्तपासणी केली. या तपासणीत कामामध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या.
या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जितीन रहमान यांनी दोषी उपअभियंता आणि सात कंत्राटदारांकडून 79 लाख रुपये 45 दिवसांच्या आत वसूल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, वसुलीची मुदत संपूनही अद्याप एकाही रुपयाचा भरणा करण्यात आलेला नाही.
दरम्यान, संबंधित कंत्राटदारांना बजावण्यात आलेल्या दोन्ही कारणे दाखवा नोटिसींची मुदतही संपली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सातही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांनी दिली.
आरोग्य व्यवस्थेशी संबंधित कामांमध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis