
अमरावती, १८ जुलै (हिं.स.) : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २४ वर्षीय युवकाच्या बँक खात्यात सायबर फसवणुकीचे तब्बल ४ लाख ६८ हजार ४३७ रुपये जमा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बँकेने खाते होल्ड करून चौकशी सुरू केल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी संबंधित युवकाने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
ग्रामीण भागातील हा युवक स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आणि क्लासेससाठी अमरावती शहरात भाड्याच्या खोलीत राहत होता. अभ्यासासाठी लायब्ररीत जात असताना त्याची स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन समवयीन युवकांशी ओळख झाली. हे दोघेही शेअर मार्केटशी संबंधित व्यवहार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दोघांनी त्यांच्या बँक खात्याची व्यवहार मर्यादा संपल्याचे सांगत नवीन बँक खात्याची गरज असल्याचे कारण पुढे केले. त्यासाठी त्यांनी संबंधित युवकाचे बँक खाते वापरण्याची विनंती करत मोबदल्याचे आमिष दाखविले. आर्थिक गरज असल्याने युवकाने महाराष्ट्र बँकेतील आपले खाते, एटीएम कार्ड आणि त्यास लिंक असलेले मोबाईल सिमकार्ड त्यांच्या ताब्यात दिले.
काही दिवसांनी रेल्वे ग्रुप-डी भरतीसाठी अर्ज करताना मोबाईल क्रमांकाची आवश्यकता भासल्याने युवकाने सिमकार्ड परत मागितले. मात्र, ते हरवल्याचे कारण सांगत दोघांनी सिमकार्ड परत देण्यास नकार दिला. त्यामुळे युवकाने नवीन सिमकार्ड घेतले.
दरम्यान, सायबर पोलिसांकडून सुरू असलेल्या एका फसवणुकीच्या तपासादरम्यान संबंधित युवकाचे बँक खाते होल्ड करण्यात आले. याबाबतचा संदेश मिळाल्यानंतर त्याने बँकेत चौकशी केली असता त्याच्या खात्यात सायबर फसवणुकीचे ४ लाख ६८ हजार ४३७ रुपये जमा झाल्याचे उघड झाले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने त्याने सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदविली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाला खाते वापरण्यास दिल्याबद्दल सात ते आठ हजार रुपये मोबदला मिळाला होता. मात्र, या आमिषाला बळी पडल्यामुळे तो स्वतःच सायबर गुन्ह्यात अडकला. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत आपले बँक खाते, एटीएम कार्ड किंवा सिमकार्ड इतरांच्या ताब्यात देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी