
जालना, 18 जुलै, (हिं.स.)। जालना शहरातील छोटे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री आनंदी स्वामी मंदिराची आषाढी यात्रा यंदा २५ जुलैपासून सुरू होत असून, यात्रेच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन विविध विभागांना आवश्यक सूचना दिल्या.
शांतता समितीच्या बैठकीत यात्रेच्या काळातील सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, वीजपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, पालखी मार्गावरील सुविधा तसेच भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सोयी-सुविधा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस उपमहापौर राजेश राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर, उपजिल्हाप्रमुख गणेशराव सुपारकर, माजी नगरसेवक शंकर लुंगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अर्जुनराव खोतकर म्हणाले की, श्री आनंदी स्वामींच्या यात्रेस दरवर्षी दोन लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः महिला भाविकांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. मंदिर परिसरात महिला पोलीस, साध्या वेशातील पोलीस तसेच पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र नियोजन करून भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.
यात्रेच्या काळात अखंडित वीजपुरवठा राहावा यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच यात्रेला अवघा काही दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने पालखी मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत, नाल्यांवर ढापे बसवावेत, स्वच्छता मोहीम राबवावी आणि पालखी मार्गावरील सर्व अडथळे दूर करावेत, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेला करण्यात आल्या.
भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था, आरोग्य सुविधा, आपत्कालीन मदत, पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण याकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश आमदार खोतकर यांनी दिले. यात्रेदरम्यान प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करून भाविकांना सुरक्षित व सुखकर दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपमहापौर राजेश राऊत यांनी सांगितले की, महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कामांचा आढावा घेतला आहे. आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिलेल्या सूचनांनुसार महानगरपालिकेच्या संबंधित विभागांना तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. बैठकीच्या शेवटी विविध विभागांनी यात्रेच्या नियोजनाबाबत आपापल्या तयारीची माहिती दिली. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून श्री आनंदी स्वामींची यात्रा शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि सुव्यवस्थित पार पडावी, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis