
सोलापूर, 18 जुलै (हिं.स.)। सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी शहराजवळ उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जुनी जलवाहिनी अचानक फुटल्याची घटना घडली आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून, पाण्याचे उंचच उंच कारंजे उडत असून धबधब्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. यासंदर्भात माहिती देताना महानगरपालिकेचे अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी सांगितले की, टेंभुर्णी येथे उजनीहून सोलापूरला येणारी मुख्य पाण्याची पाईपलाईन फुटल्याचे समजताच खबरदारीचा उपाय म्हणून जलवाहिनीचे पंप तातडीने बंद करण्यात आले आहेत. तसेच, पाईपलाईन दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्यात येतेय.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड