परभणी - बाबुलतार येथील तरुण शेतक-याची आत्महत्या
परभणी, 18 जुलै (हिं.स.)। पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे निर्माण झालेले दुबार पेरणीचे संकट, वाढता शेती खर्च आणि कर्जाच्या विवंचनेत असलेल्या पाथरी तालुक्यातील बाबुलतार येथील एका तरुण शेतकर्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची
परभणी - बाबुलतार येथील तरुण शेतक-याची आत्महत्या


परभणी, 18 जुलै (हिं.स.)। पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे निर्माण झालेले दुबार पेरणीचे संकट, वाढता शेती खर्च आणि कर्जाच्या विवंचनेत असलेल्या पाथरी तालुक्यातील बाबुलतार येथील एका तरुण शेतकर्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली.

मृत शेतक-याचे नाव ऋषिकेश भगवान जोगदंड (वय 27) असे आहे. त्यांच्याकडे तीन एकर स्वतःची तर अडीच एकर बटाईची शेती होती. शेती हा कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार होता. यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला झालेल्या पावसानंतर दीर्घ खंड पडल्याने पिकांची वाढ खुंटली असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे आधीच वाढलेल्या शेतीखर्चात आणखी भर पडणार असल्याची चिंता त्यांना सतावत होती. कर्जबाजारीपणामुळे आर्थिक ताण वाढला होता. शेतीसाठी घेतलेले कर्ज आणि उत्पन्नाबाबतची अनिश्चितता यामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या विवंचनेतून त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची माहिती समोर आली आहे.

ऋषिकेश जोगदंड यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाच्या आधारस्तंभाचे अकाली निधन झाल्याने गावात शोककळा पसरली असून शेतकरी वर्गातूनही तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande