ठेवी प्रकरण; उपमहापौरांच्या निवेदनावर तडवळकर नाराज
सोलापूर, 18 जुलै, (हिं.स.)। सोलापूर महापालिकेच्या 30 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी कोणत्या बँकेत ठेवाव्यात, यावरून सुरू झालेल्या वादात आता भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका
smc


सोलापूर, 18 जुलै, (हिं.स.)। सोलापूर महापालिकेच्या 30 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी कोणत्या बँकेत ठेवाव्यात, यावरून सुरू झालेल्या वादात आता भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यापूर्वी महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या स्थायी समितीसमोर 30 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी ठेवण्याबाबतचा विषय आला होता. त्यानंतर संबंधित ठेवी आयसीआयसीआय बँकेत ठेवण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. या निर्णयाला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि काही नगरसेवकांनी आक्षेप घेत संबंधित ठेवी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ठेवाव्यात, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.

या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रोहिणी तडवळकर म्हणाल्या, उपमहापौरांनी थेट आयुक्तांना निवेदन देण्यापूर्वी पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही. त्यामुळे या संदर्भात त्यांना जाब विचारला जाईल. तसेच महापौर आणि सभागृह नेतेही त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागतील.

तडवळकर पुढे म्हणाल्या, उपमहापौर देवकर या त्यावेळी प्रवासात असल्याने ठेवींबाबतचा निर्णय त्यांच्या अनुपस्थितीत झाला असावा. त्यांनी परत आल्यानंतर संपूर्ण माहिती घेऊन भूमिका मांडणे अपेक्षित होते. सर्व बाबी जाणून न घेता अशा प्रकारे निवेदन देणे योग्य नाही.

या संपूर्ण प्रकरणाबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही तडवळकर यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या 30 कोटी रुपयांच्या मुदत ठेवींच्या निर्णयावरून आता केवळ प्रशासनातच नव्हे, तर भाजपच्या स्थानिक नेतृत्वातही मतभेद उघड झाल्याचे चित्र दिसत असून, या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande