
अमरावती, 18 जुलै (हिं.स.) : ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांना मतदारयादी पुनरीक्षण, घरभेटी, नावनोंदणी, दुरुस्ती, प्रशिक्षण तसेच निवडणूकविषयक विविध कामांसाठी वारंवार नियुक्त केले जात असल्याने नियमित अध्यापनावर परिणाम होत असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येत आहे.
शिक्षकांचा मोठा वेळ शैक्षणिक कामांऐवजी अशैक्षणिक जबाबदाऱ्यांमध्ये जात असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे, शैक्षणिक उपक्रम राबविणे आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन करणे आव्हानात्मक ठरत असल्याचे चित्र काही गावांमध्ये दिसून येत आहे.
शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असताना दुसरीकडे शिक्षकांवर वाढत्या अशैक्षणिक कामांचा भार पडत असल्याने त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा अधिक फटका बसत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.
निवडणूक कामासाठी शिक्षक बाहेर गेल्यानंतर काही शाळांमध्ये नियमित वर्ग होत नसल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तसेच शालेय शिस्तीवर परिणाम होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
याशिवाय निवडणूकविषयक कामात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी शिक्षकांवर जबाबदारीचा ताण वाढत असून, कारवाईच्या भीतीमुळे मानसिक दबाव निर्माण होत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी निवडणूक व इतर अशैक्षणिक कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी किंवा शिक्षकांच्या नियुक्त्या अशा कामांसाठी मर्यादित ठेवाव्यात, अशी मागणी पालक आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून करण्यात येत आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी