
अमरावती, 18 जुलै (हिं.स.)। श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण विभागाने आणखी एक ऐतिहासिक यश आपल्या नावावर नोंदवत अमरावतीच्या क्रीडा क्षेत्राचा मान उंचावली आहे. बँकॉक येथे होणाऱ्या १२ व्या एशियन एज ग्रुप वॉटर पोलो चॅम्पियनशिपसाठी मंडळाच्या स्वर्णिम मिलिंद चेपे, मंथन लोमहर्ष शिवनिकर आणि शौर्य अमित गुप्ता या तीन गुणवान जलतरणपटूंची भारतीय संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे संपूर्ण विदर्भासह अमरावतीच्या क्रीडा विश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ हे देशातील जलतरण आणि वॉटरपोलो क्षेत्रातील अग्रगण्य प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. मंडळाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावावर गेल्या अनेक वर्षांपासून नियमित सराव करणाऱ्या या तिन्ही खेळाडूंनी कठोर मेहनत, सातत्य आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळविले आहे. मंडळाकडून या खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण आणि आवश्यक क्रीडा मार्गदर्शन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पदके पटकावत आपल्या गुणवत्तेची छाप उमटविली असून, आता ते आशियाई स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यामुळे अमरावतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या उल्लेखनीय यशाचे श्रेय खेळाडूंनी मंडळाचे प्रधानसचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, सचिव डॉ. माधुरी चेंडके, अमरावती जलतरण संघटनेचे अध्यक्ष वसंतराव हरणे, डॉ. टॉमी जोश, डॉ. लक्ष्मीकांत खंडागळे, जलतरण विभागप्रमुख व प्रशिक्षक डॉ. योगेश निर्मळ तसेच प्रशिक्षक मयूर कुमार आणि वैभवी थेटे यांना दिले आहे. या यशाबद्दल मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड. प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे, सचिव प्रा. रवींद्र खांडेकर, डॉ. विकास कोळेश्वर तसेच मंडळातील सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि खेळाडूंनी निवड झालेल्या तिन्ही जलतरणपटूंचे अभिनंदन करत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी सुवर्णयश मिळविण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी