आषाढी वारीसाठी ३० ते ३५ लाख भाविकांची अपेक्षा; समन्वयाने काम करण्याचे आवाहन
सोलापूर, 18 जुलै (हिं.स.)आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांच्या व्यवस्थापनासाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी कार्यालयात न बसता प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन य
Collctor


सोलापूर, 18 जुलै (हिं.स.)आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांच्या व्यवस्थापनासाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी कार्यालयात न बसता प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले. पालखी मुक्काम, विसावा आणि रिंगणस्थळी सर्व सुविधा सुरळीत असल्याची खात्री करून वारी निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पंढरपूर येथील भक्त निवास सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे तसेच सर्व नोडल अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी नोडल अधिकाऱ्यांना पालखी मुक्काम, विसावा आणि रिंगणस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन जर्मन हँगर, फिरती शौचालये, पिण्याच्या पाण्याचे टँकर, वैद्यकीय पथके, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांची पाहणी करण्याचे निर्देश दिले. सुविधा पुरविणाऱ्या विविध यंत्रणांशी सातत्याने समन्वय ठेवून कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यास त्यांनी सांगितले.

तसेच जिल्ह्यात पालखी दाखल झाल्यानंतर संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी दिवसातून किमान तीन वेळा पालखी प्रमुख आणि विश्वस्तांशी संपर्क साधावा व त्यांच्या अडी-अडचणी तातडीने सोडवाव्यात. गंभीर समस्या निर्माण झाल्यास त्वरित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.यंदाच्या आषाढी वारीसाठी ३० ते ३५ लाख भाविक पंढरपुरात येण्याची अपेक्षा व्यक्त करत, प्रत्येक अधिकाऱ्याने आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले. मागील वर्षाप्रमाणे यंदाही सर्व विभागांच्या समन्वयातून वारी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.

अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनीही सर्व नोडल अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची सविस्तर माहिती देण्यात आल्याचे सांगून नियोजनानुसार उत्कृष्ट कामकाज करण्याचे आवाहन केले. त्यांनी पालखी आगमनाचे वेळापत्रकही जाहीर केले. त्यानुसार बार्शी येथे कौंडण्यपूरच्या रुक्मिणी माता पालखीचे आगमन झाले असून, १९ जुलै रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी धर्मपुरी येथे, तर २० जुलै रोजी श्री संत तुकाराम महाराजांची पालखी सराटी (अकलूज) येथे दाखल होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande