
सोलापूर, 18 जुलै, (हिं.स.)। आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना शुद्ध, सुरक्षित आणि निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. वारीदरम्यान संशयित अन्नपदार्थांची तातडीने तपासणी करण्यासाठी ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ ही अत्याधुनिक प्रयोगशाळा पालखी सोहळ्यासोबत तैनात करण्यात आली आहे.
या मोबाईल प्रयोगशाळेमुळे संशयित अन्ननमुने अल्पावधीत तपासता येणार असून, भेसळ आढळल्यास अवघ्या एका दिवसात अधिकृत अहवाल उपलब्ध होणार आहे. या अहवालाच्या आधारे संबंधित विक्रेते किंवा भेसळखोरांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करणे शक्य होणार असल्याचे अन्न प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने एकूण २० अन्न सुरक्षा अधिकारी तैनात केले आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ९, तर पुणे, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील ११ अधिकारी सहभागी आहेत. हे अधिकारी पालखी मार्गावरील अन्न विक्रेते, भोजन केंद्रे आणि प्रसाद वितरणाच्या ठिकाणी नियमित तपासणी करणार आहेत.
अन्न प्रशासनाने वारकऱ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्नपदार्थांचा वापर करण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद किंवा भेसळयुक्त अन्न आढळल्यास तातडीने संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ उपक्रमामुळे यंदाच्या आषाढी वारीत अन्नसुरक्षा अधिक प्रभावीपणे राबविली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड