
नागपूर, 18 जुलै, (हिं.स.) : उमद्या व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या बाबुरावजी तिडके यांनी नेहमीच जनसामान्यांचा विचार केला. इतरांच्या जीवनात आनंद पेरण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. त्यामुळेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी तिडके यांना आदरांजली वाहिली.
ज्येष्ठ काँग्रेस नेते बाबुरावजी तिडके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चिटणवीस सेंटर येथे सर्वपक्षीय सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आपल्या वडिलांशी तिडके यांची घनिष्ठ मैत्री होती असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पक्षाच्या पलिकडे मैत्री जपण्याचा त्यांचा स्वभाव होता. सहकाराच्या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले. आपला साखर कारखाना अडचणीत आला त्यावेळी तो वाचावा, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देता यावे, यासाठी गृहलक्ष्मीचे दागिने त्यांनी तारण ठेवले. इतकी कळकळ त्यांच्यात होती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, दिवंगत तिडके हजरजबाबी होते. भूविकास बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करताना शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांनी सोडविल्या. संबंधांमध्ये त्यांनी कधी पक्ष येऊ दिला नाही.
दिवंगत तिडके यांचे कार्य सहकार, शिक्षण, सामाजिक अशा क्षेत्रातील मार्गदर्शक होते, असे सांगून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाजाप्रती कळकळ असलेल्या या नेत्याचा जीवन प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर