रत्नागिरी : गिरीजा राऊत प्रकरणाच्या चौकशीबाबत भाजप महिला मोर्चाचे निवेदन
रत्नागिरी, 18 जुलै (हिं.स.) । माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनबाई गिरीजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीची सखोल, निष्पक्ष व तातडीने चौकशी करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागि
गिरीजा राऊत प्रकरणाच्या चौकशीबाबत भाजप महिला मोर्चाचे निवेदन


रत्नागिरी, 18 जुलै (हिं.स.) । माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनबाई गिरीजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीची सखोल, निष्पक्ष व तातडीने चौकशी करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे व शिष्टमंडळाने केली.

जिल्हा सरचिटणीस सौ. नूपुरा मुळ्ये सौ. श्रुती ताम्हणकर उपाध्यक्ष शीतल रानडे, संगीता कवितके, रुपाली कदम,स् नेहा चव्हाण मंडल अध्यक्ष सुचिता नाचणकर, भक्ती दळी आदींच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांच्याकडे याबाबतचे निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, गिरीजा राऊत यांनी त्यांच्यावर झालेल्या कथित अत्याचाराबाबत तक्रार केली असून, हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा राजकीय, सामाजिक किंवा इतर कोणताही दबाव न येऊ देता निष्पक्ष चौकशी करून पीडितेला न्याय मिळेल, याची दक्षता पोलिस प्रशासनाने घ्यावी.

तक्रारीमध्ये अघोरी प्रथा, अंधश्रद्धा किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांबाबत आरोप करण्यात आले असतील, तर त्या आरोपांची पुराव्यांच्या आधारे स्वतंत्र व सखोल चौकशी करून संबंधित कायद्यांनुसार आवश्यक ती कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये तातडीने व निष्पक्ष कारवाई झाल्यास समाजात कायद्यावरील विश्वास अधिक दृढ होईल, असे मत व्यक्त करत सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी या प्रकरणात न्याय्य व पारदर्शक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande